८२
१ देव देवांच्या सभेत उभा राहातो. तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे. २ देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस? दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा न करताच सोडून देणार आहेस?” ३ “गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे. त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर. ४ त्या गरीब, असहाय्य लोकांना मदत कर. त्यांचे दुष्टांपासून रक्षण कर.” ५ “काय घडते आहे ते त्यांनाकळत नाही. त्यांना काही समजत नाही. ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही. त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.” ६ मी (देव) म्हणतो, “तुम्ही देव आहात तुम्ही सर्वशक्तिमान देवाची मुले आहात.” ७ परंतु तुम्ही मरणार आहात इतर लोक मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल, इतर पुढारी मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल. ८ देवा, ऊठ! तू न्यायाधीश हो. देवा, तू सर्व देशांचा पुढारी हो.