१४
१ शिनाराचा राजा अम्रफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचाराजा कदार्लागोमर आणि गोयीमाचा राजा तिदाल, २ यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोयिमाचा राजा शमेबर आणि बेलाचा म्हणजे सोअराचा राजा यांच्यांशी युद्ध केले. ३ या सर्व राजांनी आपले सैन्य सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमविले. (हे खोरे म्हणजे आताचा क्षार समुद्र) ४ या सर्व राजांनी बारा वर्षे कदार्ला गोमर राजाची सेवा केली, पंरतु तेरव्या वर्षी ते त्याच्या विरुद्ध उठले. ५ तेव्हा चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या बरोबरचे राजे लढाई करण्यास चालून आले आणि त्यांनी अष्टरोथ कर्णईम येथे रेफाई लोकांचा, हाम येथे लूजी लोकांचा, शावेह किर्याथाईम येथे एमी लोकांचा आणि, सेईर म्हणजे ईदोम डोंगराळ प्रदेशात होरी लोकांचा आणि, ६ सेईर म्हणजे ईदोम डोंगराळ प्रदेशात होरी लोकांचा आणि, सेईर म्हणजे ईदोम डोंगराळ प्रदेशात होरी लोकांचा पराभव केला आणि त्यांना एलपारान (हे वाळवंटा जवळ आहे) जवळ असलेल्या रानापर्यंत पिटाळून लावले. ७ त्यानंतर कदार्लागोमर राजा उत्तरेकडे वळाला व एन मिशपात म्हणजे कादेश येथे जाऊन त्याने अमालेकी लोकांचा पराभव केला; तसेच हससोन - तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला. ८ त्यावेळी सदोमाचा राजा, गमोराचा, राजा, अदमाचा सबोयिमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा यांनी आपले सैन्य एकत्र केले व आपल्या शत्रूशी लढण्याकरिता ते सिद्दीम खोऱ्याकडे गेले. ९ एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयीमाया राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एलामाचा राजा अर्योक यांच्या विरुद्ध ते लढले; असे चार राजे पांच राजांविरुद्द लढले. १० सिद्दीम खोऱ्यात डांबराने भरलेल्या अनेक खाणी होत्या. सदोम व गमोराचे राजे सैन्यासह पळून जाताना बरेच सैनिक खाणीत पडले परंतु बाकीचे डोंगराकडे पळून गेले. ११ तेव्हा त्यांच्या शत्रुनी सदोम व गमोरा येथील लोकांची सर्व मालमत्ता, अन्न व वस्त्र सामग्री लुटून नेली त्यांनी त्यांच्या सर्व वस्तू ही नेल्या. १२ अब्रामाचा पुतण्या लोट सदोमात राहात होता. त्याला शत्रूनीं पकडले व त्याच्या मालकीच्या सर्व मालमत्तेसह त्याला कैद करुन ते घेऊन गेले. १३ या लढाईत पकडला न गेलेला एक मनुष्य अब्राम इब्रीकडे पळून गेला व त्याने त्याला हे वर्तमान सांगितले त्यावेळी अब्राम मम्रे अमोरी वृक्षांजवळ तळ देऊन राहिला होता; मम्रे, अष्कोल व आनेर ह्यांनी एकमेकांना व अब्रामाला मदत करण्याचा करार केला. १४ लोटाला कैद करुन नेल्याचे वर्तमान अब्रामाला समजले, तेव्हा त्याने आपल्या कुटुंबात जन्मलेल्या सर्वांना एकत्र बोलावले व त्यांच्यातून लढाईच्या कामात कसलेले असे तीनशे अठरा तरबेज लढवैय्ये घेऊन त्याने थेट दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. १५ त्या रात्री त्याने आपल्या सैनिक दासासह शत्रूसैन्यावर अचानक हल्ला चढवला; त्यांनी शत्रू सैन्याचा पराभव केला व दिमिष्काच्या म्हणजे दमास्कसच्या उत्तरेस असलेल्या होबा पर्यंत त्यांचा पाठलाग केला. १६ तेव्हा शत्रुने लुटलेली सगळी मालमत्ता तसेच आपला पुतण्या लोट याची मालमत्ता, स्त्रिया आणि दास अब्रामाने परत आणले. १७ मग कदार्लागोमर व त्याच्याबरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राम आपल्या घरी गेला; तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्याला भेटावयास गेला. (त्या खोऱ्याला आता राजाचे खोरे असे म्हणतात.) १८ आणि परात्पर देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेकही भाकर व द्राक्षारस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. १९ मलकीसदेकाने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले,“अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो. २० त्या परात्पर देवाने तुझ्या शत्रूंचा पराभव करण्यास तुला मदत केली त्या परात्पर देवाचा आम्ही धन्यवाद करतो.”तेव्हा अब्रामाने लढाईच्या काळात त्याच्याजवळून जे जे घेतले होते त्याचा दहावा भाग मलकीसदेकाला दिला. २१ मग सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, “मला फक्त कैद करुन नेलेले माझे लोक द्या आणि त्यांची मालमत्ता तुम्ही तुमच्यासाठी ठेवा.” २२ परंतु अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “आकाश व पृथ्वीचा निर्माणकर्ता परमेश्वर, परात्पर देव याला मी वचन देतो की, २३ मी तुझे असलेले काहीही ठेवणार नाहीं, एखादे सूत वा जोड्याचा बंधही ठेवणार नाही ‘मी अब्रामाला श्रीमंत केले’ असे तू म्हणावे असे मला वाटत नाही. २४ माझ्या या तरुण माणसांनी जे अन्न खाल्ले आहे तेवढ्याचाच मी स्वीकार करतो; परंतु इतर लोकांना लढाईतून मिळालेल्यापैकी त्यांचा वाटा घेऊ दे, आणि त्यातून काही आनेर, अष्कोल व मम्रे यांस दे, कारण त्यांनी लढाईत मला खूप मदत केली.”