३
शब्बाथ दिवशी हात वाळलेल्या मनुष्यास बरे करणे
१ मग येशू पुन्हा एका सभास्थानात गेला, तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता. २ येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्यास बरे करतो की काय हे पाहण्यासाठी ते त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. ३ येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि लोकांच्या समोर उभा राहा.” ४ नंतर तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?” पण ते गप्प राहीले. ५ मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पहिले व त्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात लांब कर,” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. ६ नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्यास जीवे मारणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबर येशूविरूद्ध कट करीत बसले.
येशू पुष्कळ रोग्यास बरे करतो
७ मग येशू आपल्या शिष्यांसह सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीया प्रांतातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग निघाला. ८ यरुशलेम शहर, इदोम प्रांत, यार्देने नदीच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सिदोन शहराच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा समुदाय, जी मोठमोठी कामे तो करत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला. ९ मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले. १० कारण त्याने अनेक लोकांस बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्यास स्पर्श करण्यासाठी त्याच्या अंगावर पडत होते. ११ जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!” १२ पण तो त्यांना सक्त ताकीद देत होता, की मला प्रकट करू नका.
बारा प्रेषितांची निवड
१३ मग येशू डोंगरावर चढून गेला व त्यास जे शिष्य हवे होते? त्यांना त्याने स्वतःकडे बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. १४ तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली त्यांना त्याने प्रेषित हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्यासोबत असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्यास पाठवता यावे. १५ व त्यांना भूते काढण्याचा अधिकार असावा. १६ मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन त्यास पेत्र हे नाव दिले. १७ जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान त्यांना त्याने बोआनेर्गेश, ज्याचा अर्थ गर्जनेचे पुत्र असा होतो हे नाव दिले. १८ अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी १९ आणि यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला.
सैतानाच्या साहाय्याने येशू आपली कामे करीतो या आरोपास त्याने दिलेले उत्तर
२० मग येशू घरी आला आणि पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवता सुद्धा येईना. २१ त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास धरावयास निघाले कारण त्यास वेड लागले असे त्यांचे म्हणणे होते. २२ तसेच यरुशलेम शहराहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की, याच्यामध्ये बालजबूल (सैतान) आहे आणि त्या भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने हा भूते काढतो. २३ मग येशूने त्यांना आपणाजवळ बोलावून दाखल्याच्या साहाय्याने त्यांना सांगू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील? २४ आपापसात फूट पडलेले राज्य टिकू शकत नाही. २५ आपापसात फूट पडलेले घरही टिकू शकत नाही. २६ जर सैतान स्वतःलाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही, तर त्याचा शेवट होईल. २७ खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. प्रथम त्या बलवान मनुष्यास बांधले पाहिजे, मगच त्याचे घर लुटता येईल.
२८ मी तुम्हास खरे सांगतो की, लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल. २९ पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे. ३० येशू असे म्हणाला कारण त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे असे ते त्याच्याविषयी म्हणत होते.”
येशूचे वास्तविक नातेवाईक
३१ तेव्हा येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्यास बोलावले. ३२ लोकसमुदाय येशूभोवती बसला होता, ते त्यास म्हणाले, “तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहात आहेत.” ३३ त्याने त्यांना उत्तर दिले, “माझे आई व माझे भाऊ कोण आहेत?” ३४ मग तो आपल्या सभोवताली बसलेल्यांकडे सभोवती पाहून म्हणाला, “पाहा माझी आई आणि माझे भाऊ. ३५ जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई.”