३९
१ अशा रितीने यरुशलेमचा पाडाव झाला. यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले संपूर्ण सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला. नगरीचा पाडाव करण्यासाठी त्याने नगरीला वेढा घातला. २ आणि सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी यरुशलेमच्या तटबंदीला भगदाड पडले. ३ मग बाबेलच्या राजाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यरुशलेम नगरीत शिरले आणि मधल्या प्रवेशद्वाराजवळ बसले. समगारचा राज्यपाल नेर्गलशरेसर व नबो सर्सखीम हे मोठे अधिकारी आणि इतर महत्वाचे अधिकारी ह्यांचा त्यात समावेश होता. ४ सिद्कीया राजाने बाबेलच्या ह्या अधिकाऱ्यांना पाहिले आणि तो सैनिकांबरोबर पळून गेला. त्यांनी रात्री यरुशलेम सोडले ते राजाच्या बागेतून आणि तटबंदीच्या दोन भिंतीमधल्या दारातून बाहेर पळाले. ते वाळवंटाकडे गेले. ५ खास्द्यांच्या सैन्याने सिद्कीयाचा व त्याच्याबरोबर असलेल्या सैनिकांचा पाठलाग केला आणि यरिहोच्या मैदानात त्याना त्यांनी पकडले. त्यांनी सिद्कीयाला पकडून बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्याकडे नेले तेव्हा नबुखद्नेस्सर हमाथ प्रांतातील रिब्ला येथे होता. सिद्कीयाचे काय करायचे हे नबुखद्नेस्सरने ठरविले. ६ रिब्लामध्ये, सिद्कीयाच्या डोळ्यांदेखत, बाबेलच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारले. ७ मग नबुखद्नेस्सरने सिद्कीयाचे डोळे काढले आणि साखळ्यांनी बांधून बाबेलला नेले. ८ बाबेलच्या सैन्याने राजवाड्याला व यरुशलेम मधील घरांना आग लावली त्यांनी यरुशलेमची तटबंदी फोडली. ९ बाबेलच्या राजाच्या विशेष संरक्षकांचा प्रमुख नबूजरदान हा होता. त्याने यरुशलेममध्ये राहिलेल्या लोकांना कैद केले. व बाबेलला नेले. त्याला अगोदरच शरण आलेल्यांना त्याने कैद केले. एकंदरीत त्याने येरुशलेममधील सर्व लोकांनाच कैद केले. १० पण नबूजरदानने यहूदातील काही गरीब लोकांना सोडले. ह्या लोकांजवळ काहीही नव्हते म्हणून नबूजरदानने त्यांना द्राक्षमळे व जमीन दिली. ११ पण नबुखद्नेस्सरने यिर्मयाच्या बाबतीत, नबूजरदानला ताकीद दिली होती. नबूजरदान बाबेलच्या राजाच्या खास संरक्षकांचा प्रमुख होता. नबुखद्नेस्सरने अशी ताकीद दिली होती की. १२ “यिर्मयाला शोधून काढा व त्याची काळजी घ्या. त्याला इजा करु नका. तो मागेल ते त्याला द्या.” १३ म्हणून राजाच्या खास संरक्षकांचा प्रमुख नबूजरदान याने नबूशजबान या प्रमुख सेनाधिकाऱ्याला, नेर्गल सरेसर या मोठ्या अधिकाऱ्याला आणि सैन्यातील इतर अधिकाऱ्यांना यिर्मयाला शोधण्यासाठी पाठविले. १४ मंदिराच्या चौकात, यहूदाच्या राजाच्या पाहऱ्यात असलेल्या यिर्मयाला त्या लोकांनी सोडविले आणि गदल्याकडे सोपविले. गदल्या अहिकामचा व अहिकाम शाफानचा मुलगा होता. यिर्मयाला घरी पाठवावे असा गदल्याला हूकूम होता. म्हणून यिर्मयाला घरी नेले गेले व तो त्याच्या आप्तांमध्ये राहू लागला. १५ यिर्मया मंदिराच्या चौकात पहाऱ्यात असताना त्याला परमेश्वराचा संदेश आला. तो असा होता: १६ “यिर्मया मूळ कुशचा रहिवासी असलेल्या एबद-मलेखला संदेश दे ‘सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांना देव म्हणतो: माझे यरुशलेमबद्दलचे भाकीत मी लवकरच खरे ठरवीन. माझे संदेश अरिष्टावरुन खरे ठरतील, चांगल्या गोष्टी घडून नाही. सर्व गोष्टी खऱ्या ठरत असताना तू तुझ्या डोळ्यांनी पाहशील. १७ पण, एबद-मलेख, मी तुला त्या दिवशी वाचवीन.’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. तू ज्या लोकांना घाबरतोस, त्यांच्या स्वाधीन मी तुला करणार नाही. १८ तू युध्दात मरणार नाहीस, तर तू निसटशील आणि जगशील. तू माझ्यावर विश्वास ठेवलास, म्हणून हे घडेल.” हा परमेश्वराचा संदेश आहे.