३३
१ पाहा! तुम्ही युध्द करता आणि दुसऱ्यांच्या वस्तू चोरता. पण त्यांनी तुमचे काहीही चोरले नाही. तुम्ही दुसऱ्यांविरूध्द उठता पण त्यांनी तुमच्याविरूध्द कधीच उठाव केला नाही. म्हणून जेव्हा तुम्ही चोरी करायचे थांबवाल तेव्हा ते तुमच्या वस्तू चोरतील. तुम्ही लोकांविरूध्द उठाव करायचे सोडाल तेव्हा ते तुमच्याविरूध्द उठाव करतील.मग तुम्ही म्हणाल: २ “परमेश्वरा,” आमच्यावर दया कर. आम्ही तुझ्या मदतीची वाट पाहिली. परमेश्वरा, रोज आम्हाला शक्ती दे. संकटकाळी आमचे रक्षण कर. ३ तुझा प्रचंड आवाज लोकांना घाबरवितो. आणि ते तुझ्यापासून दूर पळतात. तुझी महानता राष्ट्रांना पळून जाण्यास भाग पाडते.” ४ तुम्ही लोकांनी युध्दात वस्तू चोरल्या. त्या तुमच्याकडून परत घेतल्या जातील. खूप लोक येतील आणि तुमची संपत्ती लुटतील. टोळधाड ज्याप्रमाणे सर्व पीक फस्त करते तसे हे होईल. ५ परमेश्वर महान आहे. तो उच्च स्थानी राहातो. परमेश्वर सियोनमध्ये प्रामाणिकपणा व चांगुलपणा भरतो. ६ यरूशलेमा तू श्रीमंत आहेस. देवाच्या शहाणपणात व ज्ञानात तू श्रीमंत आहेत. तू तारणात श्रीमंत आहेस. तू परमेश्वराचा आदर करतो व तेच तुला श्रीमंत करते. म्हणून लक्षात असू दे की तू सतत राहाशील. ७ पण ऐक! बाहेर देवदूत रडत आहेत. शांती आणणारे दूत फार जोराने रडत आहेत. ८ रस्ते नष्ट केले गेले आहेत. रस्त्यावर कोणीही नाही. लोकांनी केलेले करार मोडले आहेत. साक्षीदारांच्या पुराव्यावर विश्वास ठेवायला लोक तयार नाहीत. कोणी कोणाला मान देत नाही. ९ भूमी शोक करीत मरणपंथाला लागली आहे. लबानोन मरत आहे आणि शारोन दरी कोरडी व ओसाड झाली आहे. बाशान व कर्मेल यामध्ये एकेकाळी सुंदर झाडे होती. पण आता त्या झाडांची वाढ खुंटली आहे. १० परमेश्वर म्हणतो, “आता मी उठून माझी महानता दाखवीन. आता मी लोकांना माझे महत्व पटवीन. ११ तुम्ही लोकांनी निरर्थक गोष्टी केल्यात. त्या गोष्टी वाळलेल्या गवताप्रमाणे वा पेंढ्यातील काडीप्रमाणे आहेत. त्यांची किंमत शून्य आहे. तुमचा आत्माअग्नीप्रमाणे आहे. तो तुम्हाला जाळील. १२ लोकांची हाडे चुन्याप्रमाणेहोईपर्यंत म्हणजेच हाडांचा भुगा होईपर्यंत लोक जाळले जातील. काटे आणि वाळलेली झुडुपे ह्यांच्याप्रमाणे चटकन ते जळतील. १३ “दूर देशांत राहणाऱ्या लोकांनो, मी काय केले ते ऐका. माझ्याजवळ राहणाऱ्या, लोकांनो, माझे सामर्थ्य जाणा.” १४ सियोनमधील पापी घाबरले आहेत. दुष्कृत्ये केलेले भीतीने कांपत आहेत. ते म्हणतात, “ह्या नाश करणाऱ्या अग्नीपासून आपल्याला कोणी वाचवू शकेल का? निरंतर जळणाऱ्या ह्या अग्नीजवळकोणी राहू शकेल का?” १५ हो! पैशासाठी दुसऱ्यांना जे त्रास देत नाहीत असे प्रामाणिक लोक या अग्नीमधूनही वाचतील. ते लोक लाच घेत नाहीत. दुसऱ्याची हत्या करण्याच्या बेताला ते नकार देतात. दुष्कृत्यांच्या योजनांकडे ते पाहण्याचे टाळतात. १६ ते लोक उच्च स्थानावर सुरक्षित राहतील. उंच पर्वतांवरील दुर्ग त्यांचे रक्षण करतील. त्यांना नेहमीच अन्न व पाणी मिळेल. १७ तुम्ही स्वत:च्या डोळ्यांनी राजाला (देवाला) त्याच्या सुंदर रूपात पाहाल. तुम्ही महान भूमी पाहाल. १८ तुम्ही तुमच्या भूतकाळातील संकटांबद्दल विचार कराल. तुम्ही विचार कराल, “ते दुसऱ्या देशातील लोक कोठे ओहेत? ते आम्हाला न समजणारी भाषा बोलत. १९ दुसऱ्या देशातील ते अधिकारी आणि कर गोळा करणारे कोठे आहेत? आमच्या संरक्षक बुरूजांची मोजदाद करणारे हेर कोठे आहेत? ते सर्व नाहीसे झाले.” २० आमच्या धार्मिक सणांच्या नगरीकडे सियोनकडे पाहा, विश्राम करण्याच्या सुंदर जागेकडे, यरूशलेमकडे पाहा. यरूशलेम, कधीही न हालणाऱ्या तंबूसारखी आहे. त्याच्या घट्ट रोवलेल्या मेखा कधीही उखडल्या जाणार नाहीत. त्याच्या दोऱ्या कधीही कापल्या जाणार नाहीत. २१ का? कारण सर्वशक्तिमान परमेश्वर तेथे आहे. त्या भूमीवर झरे व रूंद पात्रांच्या नद्या आहेत. पण तेथे शत्रूंच्या नावा अथवा जहाजे नसतील. त्या नावांवर काम करणारे तुम्ही लोक दोऱ्या सोडतात तसेच काम सोडू शकाल. तुम्ही डोलकाठी पुरेशी घट्ट करू शकणार नाही. तुम्हाला शीड उभारता येणार नाही का? २२ कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वरच आमचे कायदे करतो. परमेश्वर आमचा राजा आहे. तो आमचे रक्षण करतो. म्हणून तो आम्हाला खूप संपत्ती देईल. पंगूनासुध्दा युध्दात खूप धन मिळेल. २३ तुझे दोर ढिले पडले आहेत; ते डोळ्काठीच्या आधार स्थिर राखीत नाहीत ; ते शीड पसरीत नाहीत; ते विपुल लुट वाटीतात ; लंगडेहि लुट करितात. २४ येथे राहणारा कोणीही “मी विटलो आहे” असे म्हणणार नाही. ज्यांना क्षमा केली गेली आहे असेच लोक तेथे राहतात.