२७
पौलाचा रोमपर्यंतचा जलप्रवास क्रेतापर्यंत
१ जेव्हा आम्ही समुद्रमार्गे इटलीला जाण्याचे ठरवले तेव्हा पौल व इतर काही कैद्यांना युल्य नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले, युल्य हा अगस्तस सेनेचा एक अधिकारी होता. २ अद्रमुत्तिय येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो, हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते, आम्ही या जहाजातून प्रवासास निघालो, तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथे राहणारा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता. ३ दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोन नगराला पोहचलो, युल्य पौलाशी फार चांगला वागला, पौलाच्या मित्रांना त्याची काळजी घेता यावी म्हणून त्याने मोकळीक दिली. ४ तेथून आम्ही समुद्रमार्गे पुढे निघालो आणि कुप्रच्या किनाऱ्याकिनाऱ्याने निघालो कारण वारा समोरचा होता. ५ किलकिया व पंफुलिया प्रांताजवळच्या समुद्राला पार करून लुक्या प्रांतातील मुर्या बंदरात पोहचलो. ६ तेथे शताधिपतीला इटलीला जाणारे आलेक्सांद्रीयाचे एक जहाज आढळले, त्याने आम्हास त्या जहजात बसविले. ७ आम्ही बरेच दिवस हळूहळू प्रवास करीत होतो, कनिदा शहरापर्यंत येण्यासाठी आम्हास फार कष्ट पडले कारण वारा तोंडचा होता, आम्हास पुढे जाता येईना, म्हणून आम्ही क्रेताच्या दक्षिणेकडून सलमोन शहराच्याच्या समोरच्या बाजूस गेलो. ८ यापुढे आमचे जहाज क्रेत बेटाच्या किनाऱ्याने मोठ्या अडचणीतून सुरक्षित बंदर येथे पोहोचले, तेथे जवळच लसया नगर होते.
मिलितापर्यंत तुफान व नौकाभंग
९ बराच वेळ वाया गेला होता आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते, कारण एव्हाना यहूद्यांच्या उपासाचा काळही निघून गेला होता, तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला, पौल म्हणाला, १० “पुरुषांनो, मला वाटते, आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल.” ११ परंतु पौलाच्या मताशी जहाजाचा कप्तान व मालक सहमत झाले नाहीत, उलट जहाजाच्या कप्तानाच्या व मालकाच्या बोलण्यावरच शताधिपतीचा जास्त विश्वास होता. १२ परंतु हे सुरक्षित म्हंटलेले बंदर हिवाळ्यात मुक्काम करायला सोईचे नव्हते, म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले.
१३ तेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले, तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याकिनाऱ्याने तारू हाकारीत जाऊ लागले, जहाजावरच्या लोकांस वाटू लागले की, अशाच प्रकारचे वारे आम्हास पाहिजे होते व तसेच ते वाहत आहे. १४ परंतु लवकरच क्रेत बेटावरून ‘ईशान्येचे’ म्हंटलेले वादळी वारे वाहू लागले. १५ आणि जहाज वादळी वाऱ्यात सापडले व त्यास पुढे जाता येईना, तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न सोडून आम्ही वाऱ्याने जहाज भरकटू दिले. १६ मग कौदा नावाच्या लहानशा बेटाच्या किनाऱ्याकिनाऱ्याने आम्ही जाऊ लागलो, मग थोड्या खटपटीनंतर जीवन रक्षक होडीवर उचलून घेतली. १७ जीवन रक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले, जहाज वाळू असलेल्या सूर्ती नावाच्या उथळ जागी आदळेल या भीतीने त्यांनी शीड खाली काढले, तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले. १८ जोरदार वादळी वाऱ्याचे तडाखे खावे लागल्याने लोकांनी दुसऱ्या दिवशी जहाजावरील सामान बाहेर टाकून दिले.
१९ तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हातांनी बाहेर काढून टाकली. २० बरेच दिवस आम्हास सूर्य किंवा तारे दिसले नाहीत, वादळ फारच भयंकर होते, आम्ही आमच्या तरण्याची सर्व आशा सोडून दिली, आम्ही मरणार असे आम्हास वाटू लागले. २१ बराच काळपर्यंत लोकांस उपवास घडल्यावर, मग पौल त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “गुहस्थांनो, क्रेतावरून मुक्काम हलवू नका, हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता, म्हणजे हा त्रास व ही हानी तुम्हास टाळता आली असती.” २२ पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंती आहे, कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोंचणार नाही, आपले जहाज मात्र गमवावे लागेल. २३ मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची उपासना मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला. २४ आणि तो दूत म्हणाला, “पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे, तुझ्याबरोबर प्रवास करणारे सर्व लोक देवाने त्याच्या दयेने तुला दिले आहेत. २५ तेव्हा गृहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा! कारण मला जसे देवाने सांगितले, अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे. २६ परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरून थांबावे लागले.”
२७ चौदाव्या रात्री आमचे जहाज अद्रिया समुद्रातून चालले होते, तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोचले असावे असा अंदाज केला. २८ त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती चाळीस मीटर भरली, आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती तीस मीटर भरली. २९ ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीती वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करीत वाट पाहू लागले. ३० खलाशांनी जहाजातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकल्याचे भासवून जीवन रक्षक होड्या समुद्रात टाकल्या. ३१ परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, “जर हे लोक जहाजात राहणार नाहीत, तर तुम्ही वाचणार नाही.” ३२ यावर शिपायांनी जीवन रक्षक होड्यांचे दोर कापून टाकले आणि त्याखाली पाण्यात पडू दिल्या.
३३ पहाट होण्याअगोदर पौलाने त्या सर्वांना काहीतरी खाण्याचा आग्रह केला, तो म्हणाला, “आज चौदावा दिवस आहे, तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात पण खाणेपिणे काही केले नाही, अन्नाचा कणही खाल्ला नाही. ३४ तुम्ही थोडे तरी खा, कारण तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्ही खाणे जरुरीचे आहे, तुम्ही खावे अशी मी तुम्हास विनंती करतो, तुमच्यापैकी कोणाच्या केसासही धक्का लागणार नाही.” ३५ असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले, ती भाकर मोडून तो खाऊ लागला. ३६ ते पाहून त्या सर्वांना धीर आला आणि ते जेवले. ३७ आम्ही सर्व मिळून जहाजात दोनशे शहात्तर लोक होतो. ३८ त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्याल्यानंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला.
३९ दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही, परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली, म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरवले. ४० म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले, त्याचबरोबर सुकाणूंच्या दोऱ्या एकत्र केल्या, नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे शीड वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले. ४१ परंतु दोन समुद्रांमधील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले, तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला. ४२ तेव्हा शिपायांनी कैद्यांना मारण्याचे ठरवले, यासाठी की त्यांच्यातील कोणी पोहोत जाऊन पळू नये. ४३ परंतु शताधिपतीला पौलाला वाचवायचे होते म्हणून त्याने शिपायांना तो विचार सोडून देण्यास सांगितले आणि ज्यांना पोहता येत असेल त्यांनी जहाजातून उड्या टाकून किनाऱ्याला जावे अशी आज्ञा केली. ४४ बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले, अशा रीतीने जहाजातील सर्वजण सुखरुपपणे भूमीवर पोहोचले.