३
ख्रिस्ताच्या पुनरागमनाचा दिवस
१ प्रियजनहो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हास लिहित आहे, या दोन्हीमध्ये मी तुम्हास आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करीत आहे. २ ह्यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी अगोदर सांगितलेल्या वचनांची आणि जो आपला प्रभू व तारणारा आहे त्याने तुमच्या प्रेषिताद्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी. ३ प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्या वासनेप्रमाणे चालणारे, थट्टाखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, ४ त्याच्या येण्याचे वचन कोठे आहे? कारण पूर्वज निजले तेव्हापासून सर्व गोष्टी जश्या उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. ५ कारण ते हे जाणूनबुजून विसरतात की, देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली. ६ त्याच्यायोगे, तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. ७ पण, आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली असून, ती न्यायानिवाडाच्या व भक्तीहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.
८ पण प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नये की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसमान आणि हजार वर्षे एका दिवसासमान आहेत. ९ कित्येक लोक ज्याला उशीर म्हणतात तसा उशीर प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तर तो तुमच्याविषयी फार सहनशील आहे. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.
१० तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्यादिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तापून विरघळतील आणि पृथ्वी तिच्यावरील कामे जळून जातील.
तयारी ठेवण्याची आवश्यकता
११ या सर्व गोष्टी जर लयास जाणार आहेत म्हणून तुम्ही पवित्र आचरणात व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? १२ देवाच्या त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे अत्यंत तापून वितळतील. १३ तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व राहते, असे नवे आकाश व नवे पृथ्वी त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.
१४ म्हणून प्रियजनहो, या गोष्टींची वाट पाहता असता, तुम्ही त्याच्या दृष्टीने निर्दोष व निष्कलंक असे शांतीत असलेले आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा. १५ आणि आपल्या प्रभूची सहनशीलता हे तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हास असेच लिहिले आहे. १६ आणि त्याने आपल्या सर्व पत्रांत या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये समजण्यास कठिण अशा काही गोष्टी आहेत आणि जे अशिक्षित व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाहि करतात; अशाने आपल्या स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.
१७ तर प्रियजनहो, तुम्हास या गोष्टी तुम्हास पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतीप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा. १८ आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्यास आता आणि सर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन.