49
अम्मोन्यांविषयी भविष्य
1 अम्मोनी लोकांविषयी परमेश्वर असे म्हणतो,
“इस्राएली लोकांस मुले नाहीत का? इस्राएलात कोणीही वारीस नाही काय?
तर मिलकोमने गाद ताब्यात का घेतो आणि त्याचे लोक त्याच्या नगरात का राहतात?”
2 यास्तव परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की,
अम्मोनाच्या लोकांस राब्बाविरूद्ध जेव्हा मी लढाईसाठी संकेताचा आवाज ऐकावयास लावीन, तेव्हा ते ओसाडीचा ढीग होईल आणि त्यांच्या कन्या अग्नीने जाळल्या जातील.
कारण जे कोणी त्याच्या ताब्यात होते त्याचा ताबा इस्राएल घेईल.” असे परमेश्वर म्हणतो.
3 हे हेशबोना, विलापात आक्रोश कर, कारण आय याचा नाश झाला आहे! राब्बातील कन्यांनो, मोठ्याने ओरडा! तागाची वस्त्रे घाला,
आकांत करा आणि तुम्ही व्यर्थ इकडे तिकडे धावाल कारण मिलकोम राजा
आपले याजक व अधिकाऱ्याबरोबर एकत्रित बंदिवान होऊन जाईल.
4 तू आपल्या सामर्थ्याबद्दल का गर्व करते? हे अविश्वासू कन्ये, तुझे सामर्थ्य दूर वाहून जाईल,
तू आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवते. तू म्हणते, माझ्याविरूद्ध कोण येईल?
5 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, मी तुझ्यावर दहशत आणीन.
ही दहशत जे कोणी तुझ्या सभोवताली आहेत त्यांच्या सर्वांपासून येईल. तुमच्यातला प्रत्येकजण त्यांच्यापुढे विखरला जाईल.
तेथे पळून जाणाऱ्यांना एकत्र जमवायला कोणी असणार नाही.”
6 परंतु यानंतर मी अम्मोनी लोकांचा बंदिवास उलटवीन. असे परमेश्वर म्हणतो.
अदोमाविषयी भविष्य
7 अदोमाविषयी, सेनाधीश परमेश्वर हे म्हणतो, “तेमानात आता काही ज्ञान नाही काय?
ज्या कोणाला गोष्टी समजतात त्यांचे चांगले सल्ले अदृश्य झाले आहेत काय? त्यांचे ज्ञान दूर गेले आहे का?
8 ददानातल्या रहिवाश्यांनो, पळा! माघारी फिरा! जमिनीतल्या विवरात रहा.
कारण मी त्यास शिक्षा करणार आहे त्या समयी मी एसावाची अरिष्टे त्याच्यावर आणीन.
9 जर द्राक्षे काढणारे तुझ्याकडे आले, तर ते थोडे मागे ठेवणार नाहीत का?
जर चोर रात्रीत आला, तर तो त्यास पाहिजे तितके चोरणार नाही का?
10 पण एसावाचे कपडे काढून त्यास उघडे केले आहे. मी त्याची लपण्याची ठिकाणे उघड केली आहेत.
म्हणून त्याच्याने आपल्याला लपवता येत नाही. त्याची मुले, भाऊ व त्याचे शेजारी नष्ट झाले आहेत आणि तो गेला आहे.
11 तुझे अनाथ मागे ठेव. मी त्यास जिवंत ठेवण्याची काळजी घेईल आणि तुझ्या विधवा माझ्यावर भरवसा ठेवू शकतील.”
12 कारण परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, ज्यांची योग्यता नाही त्यांना खचित काही पेला प्यावा लागेल. तर तू स्वतःशी असा विचार करतो की तू शिक्षेशिवाय राहशील? तुला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, कारण तुला तो खचित प्यावा लागेल.” 13 परमेश्वर म्हणतो, “कारण मी आपलीच शपथ वाहिली आहे की, बस्रा दहशत, निंदा, उध्वस्त, आणि शापासाठीचा विषय होईल. ते शहर पडझड झालेल्या दगडांची रास होईल. त्यांची सर्व नगरे कायमची उध्वस्त होतील.”
14 मी परमेश्वराकडून वर्तमान ऐकले आहे की, राष्ट्रांकडे दूत पाठविला आहे,
“एकत्र व्हा आणि हल्ला करा. लढायला सज्ज व्हा.”
15 कारण पाहा, दुसऱ्या राष्ट्रांच्या तुलनेत मी तुला लहान, लोकांकडून तुच्छ केले आहे.
16 जी तू खडकाच्या कपाऱ्यांमध्ये राहतेस व डोंगरांचा माथा धरून राहतेस
त्या तुझ्या भयंकरपणाने व तुझ्या हृदयाच्या गर्वाने तुला फसविले आहे. जरी तू गरुडाप्रमाणे उंच घरटे बांधलेस तरी
तेथून मी तुला खाली आणीन. असे परमेश्वराचे म्हणणे आहे.
17 तेथून जाणाऱ्या प्रत्येकाला अदोम दहशत होईल.
तशा प्रत्येक व्यक्ती थरथरेल आणि त्याच्या सर्व अरिष्टाविषयी फूत्कार टाकेल.
18 परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांचे शेजारी यांना जसे उलथून टाकले तसे होईल.
तेथे कोणीही जिवंत राहणार नाही. तेथे कोणी व्यक्ती मुक्काम करणार नाही. देव असे म्हणाला,
19 “पाहा, तो सिंहासारखा यार्देनेच्या वनातून वर टिकाऊ कुरणाच्या देशात येईल.
कारण मी अदोमाला त्यातून जलद पळून जायला भाग पाडीन आणि जो कोणी मी निवडलेला आहे त्यास तिच्यावर नेमून ठेवीन.
कारण माझ्यासारखा कोण आहे आणि मला कोण हुकूम करीन? कोणता मेंढपाळ मला विरोध करण्यास समर्थ आहे?”
20 म्हणून अदोमाविरूद्ध परमेश्वराने ठरवलेली योजना काय आहे?
तेमानाच्या रहिवाश्याविरूद्ध त्याने जी योजना तयार केली ती ऐका;
ते खचित लहानातील लहान कळपालासुद्धा ओढून नेतील.
त्यांची कुरणाचे देश ओसाड जागेत बदलतील.
21 त्यांच्या पडण्याच्या आवाजाने धरणी हादरेल. त्यांच्या दुःखाचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्यंत ऐकू येत आहे.
22 पाहा, कोणीतरी गरुडासारखा हल्ला करील आणि खाली झडप घालील व बस्रावर आपले पंख पसरेल.
मग त्या दिवशी, अदोमाच्या सैनिकांचे हृदय प्रसूती वेदना होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल.
दिमिष्काविषयी भविष्य
23 दिमिष्काविषयीः हमाथ व अर्पद लज्जित होतील, कारण त्यांनी अरिष्टाची बातमी ऐकली आहे.
ते नाहीसे झाले आहेत! ते समुद्रासारखे खवळले आहेत, ते शांत होऊ शकत नाही.
24 दिमिष्क फार दुबळे झाले आहे. ती पळून जाण्यास माघारी फिरली आहे. दहशतीने तिला वेढले आहे.
दुःखाने तिला घेरले आहे, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेदना होत आहेत.
25 तिचे लोक म्हणतात, “प्रसिद्ध नगरी, ज्या एक नगरीवर मी हर्ष करीत होते. अजूनपर्यंत कशी खाली केली नाही?
26 म्हणून त्याची तरुण माणसे त्याच्या चौकात पडतील
आणि लढणारी माणसे त्या दिवशी नष्ट होतील.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
27 “कारण मी दिमिष्काच्या तटाला आग लावीन. आणि ती बेन-हदादचे बालेकिल्ले खाऊन टाकील.”
केदार व हासोराविषयी भविष्य
28 केदाराविषयी व हासोराची राज्ये, परमेश्वर नबुखद्नेस्सरास हे म्हणत आहे (आता बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर या ठिकणी हल्ला करण्यास जाणार होता)
“उठा आणि केदारावर हल्ला करा व पूर्वेच्या त्या लोकांचा नाश करा.
29 त्यांचे सैन्य त्यांचे तंबू व त्यांचे कळप, त्यांच्या तंबूचे पडदे व त्यांचे सर्व साहित्य घेऊन जातील.
केदारच्या लोकांकडून त्यांचे उंट आपणासाठी घेऊन जातील आणि त्यांना ओरडून सांगतील. ‘चोहोकडे सर्व दहशत आहे.’
30 परमेश्वर म्हणतो, पळा! हासोराच्या रहिवाश्यांनो, दूर भटका, जमिनीच्या विवरात रहा.
कारण बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने तुमच्याविरुध्द नवीन योजना योजली आहे. पळा! माघारी फिरा!
31 परमेश्वर म्हणतो, उठा! स्वस्थ व सुरक्षित राहणाऱ्या राष्ट्रावर हल्ला करा.
त्यास त्यामध्ये वेशी व अडसर नाहीत आणि त्यांच्यात त्यांचे लोक राहतात.
32 कारण त्यांचे उंट लुटले जातील व त्यांची विपुल संपत्ती युद्धाची लूट अशी होईल.
त्यांच्या दाढीच्या कडा कापलेल्यांना सर्व दिशांकडे विखरीन
आणि मी त्यांच्यावर सर्व बाजूने संकटे आणीन.” असे परमेश्वर म्हणतो.
33 “हासोर कोल्ह्यांची वस्ती होईल, कायमचे ओसाड होईल.
तेथे कोणीही राहणार नाही. कोणी मनुष्यप्राणी तेथे राहणार नाही.”
एलामाविषयी भविष्य
34 यहूदाचा राजा सिद्कीया याच्या राज्याच्या सुरवातीच्या काळात एलामाविषयी यिर्मया संदेष्ट्याकडे परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले, 35 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, त्यांच्या बलाचा मुख्य भाग एलामाचे धनुर्धारी माणसे यांना मी लवकरच मोडीन.
36 कारण मी आकाशाच्या चार कोपऱ्यातून चार वारे आणीन,
आणि मी एलामाच्या लोकांस त्या सर्व वाऱ्यांकडे विखरीन. ज्याकडे एलामाचे घालवलेले जाणार नाहीत असे एकही राष्ट्र असणार नाही.
37 म्हणून मी एलामाच्या शत्रूसमोर आणि जे त्याचा जीव घेऊ पाहतात त्यांच्यासमोर तुकडे तुकडे करीन.
कारण मी त्यांच्याविरुद्ध अरिष्ट, माझा संतप्त क्रोध आणीन. असे परमेश्वर म्हणत आहे.
आणि मी त्यांना संपूर्ण नाश करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन.
38 मग मी एलामात आपले राजासन ठेवीन आणि तेथून त्याचा राजा व त्याचे अधिकारी यांना नष्ट करीन.” असे परमेश्वराचे सांगणे आहे.
39 “शेवटल्या दिवसात असे घडेल की, मी एलामात बंदिवासात गेलेले परत आणीन,” असे परमेश्वराचे सांगणे आहे.