40
सीयोनेसंबंधी परमेश्वराचे सांत्वनपर उदगार
लूक 3:4-6
1 तुमचा देव म्हणतो, सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा.
2 यरूशलेमेशी प्रेमळपणाने बोला; आणि तिला घोषणा करून सांगा की
तुझे युद्ध संपले आहे, तिच्या अन्यायाची क्षमा झाली आहे,
तिने आपल्या सर्व पापांसाठी परमेश्वराच्या हातून दुप्पट स्विकारले आहे.
3 घोषणा करणाऱ्याची वाणी म्हणते, अरण्यात परमेश्वराचा मार्ग तयार करा; आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा.
4 प्रत्येक दरी उंच होईल, आणि प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट होईल;
आणि खडबडीत जमीन सपाट होईल आणि उंचसखल जागा मैदान होईल.
5 आणि परमेश्वराचे गौरव प्रगट होईल आणि सर्व लोक ते एकत्रित पाहतील; कारण परमेश्वराच्या मुखातील हे शब्द आहेत.
6 एक वाणी म्हणाली, “घोषणा कर” दुसरे उत्तर आले, “मी काय घोषणा करू?”
सर्व देह गवत आहे आणि त्यांचा सर्व विश्वासूपणाचा करार वनातील फुलासारखा आहे.
7 गवत सुकते व फुल कोमजते, जेव्हा परमेश्वराच्या श्वासाचा फुंकर त्यावर पडतो; खात्रीने मानवजात गवत आहे.
8 “गवत सुकते आणि फुल कोमेजते पण आमच्या देवाचे वचन सदासर्वकाळ उभे राहते.”
9 सियोनेस* सियोनेतून, सुवार्ता घेऊन येणारे जाणारे, उंच डोंगरावर चढ;
यरूशलेमेस † यरूशलेमेतूनसुवार्ता सांगणाऱ्ये, आपला आवाज जोराने उंच कर. मोठ्याने आरोळी मार; घाबरू नकोस.
यहूदातील नगरांना सांग, येथे तुझा देव आहे!
10 पाहा, प्रभू परमेश्वर, विजयी वीरासारखा येत आहे आणि त्याचे बलवान बाहू त्यासाठी सत्ता चालवील.
पाहा, त्याचे बक्षीस त्याच्याबरोबर आहे आणि त्याचा मोबदला त्याच्यापुढेच आहे.
11 मेंढपाळाप्रमाणे आपल्या कळपास तो चारील,
तो कोकरास आपल्या बाहूत एकवटून त्यांना आपल्या उराशी धरून वाहील आणि तान्ह्या पिल्लांना पाजणाऱ्या मेंढ्याना तो जपून नेईल.
इस्राएलाचा अद्वितीय देव
12 आपल्या ओंजळीने समुद्राचे पाणी कोणी मोजले आहे, आकाशाचे माप आपल्या वतीने,
पृथ्वीवरची धूळ पाटीत धरली, डोंगराचे वजन तागडीत
किंवा टेकड्या तराजूत तोलल्या आहेत?
13 परमेश्वराचे मन कोणाला समजले आहे किंवा त्याचा सल्लागार म्हणून कोणी सूचना दिल्या आहेत?
14 त्याने कोणापासून कधी सूचना स्विकारली? कोणी त्यास योग्य गोष्टी करण्याचा मार्ग शिकवला,
आणि त्यास कोणी ज्ञान शिकवले किंवा सुज्ञतेचा मार्ग दाखवला?
15 पाहा, राष्ट्रे बादलीतल्या एका थेंबासमान आहेत आणि तराजूतल्या धुळीच्या कणासारखी मोजली आहे;
पाहा तो बेटही धुळीच्या कणासारखे उचलतो.
16 लबानोन जळणास पुरेसा नाही,
किंवा त्यातले वनपशू होमार्पणासाठी पुरेसे नाहीत.
17 त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे अपुरे आहेत; त्याच्या दृष्टीने ती काही नसल्यासारखीच आहेत.
18 तर मग तुम्ही देवाची तुलना कशाशी कराल? तर त्याची तुलना कोणत्या प्रतिमेशी करणार?
19 मूर्ती! कारागीराने ओतून केली आहेः सोनार तिला सोन्याने मढवतो आणि तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या ओततो.
20 जो अर्पण देण्यास असमर्थ असा गरीब तो न कुजणारे लाकूड निवडतो; न पडणारी मूर्ती बनविण्यासाठी तो निपूण कारागीर शोधतो.
21 तुम्हास माहीत नाही काय? तुम्ही ऐकले नाही काय? तुम्हास सुरवातीपासून सांगितले नाही काय? पृथ्वीचा पाया घातल्यापासून हे तुम्हास समजले नाही काय?
22 जो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर बसतो तो हाच आहे आणि त्याच्यापुढे रहिवासी टोळासारखे आहेत.
तो आकाश पडद्याप्रमाणे ताणतो आणि त्यामध्ये राहण्यासाठी तंबूप्रमाणे पसरतो.
23 तो अधिपतींना काहीही नसल्यासारखे कमी करतो आणि पृथ्वीच्या अधिपतींना अर्थशून्य करतो.
24 पाहा, ते केवळ लावले आहेत; पाहा, ते केवळ पेरले आहेत; पाहा त्यांनी केवळ भूमीत मूळ धरले आहे,
तो त्यांच्यापुढे त्यावर फुंकर घालतो आणि ते सुकून जातात व वादळ त्यांना धसकटासारखे उडवून नेते.
25 “तर तुम्ही माझी तुलना कोणाशी कराल? माझ्यासारखा कोण आहे? असे तो पवित्र प्रभू म्हणतो.
26 आकाशाकडे वर पाहा! हे सर्व तारे कोणी निर्माण केले आहेत?
तो त्याच्या निर्मीतीचे मार्गदर्शन करून बाहेर नेतो आणि त्या सर्वांना नावाने बोलावतो.
त्याच्या सामर्थ्याच्या महानतेमुळे आणि प्रबळ सत्ताधीश आहे म्हणून, त्यातला एकही उणा नाही.
27 हे याकोबा, तू असे का म्हणतोस, आणि इस्राएलास जाहीर करतोस,
माझे मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहेत आणि माझा देव माझ्या समर्थनाविषयी लक्ष देत नाही?
28 तुला माहीत नाही काय? तू ऐकले नाही काय?
परमेश्वर हा सनातन देव, पृथ्वीच्या सीमा निर्माण करणारा,
थकत किंवा दमत नाही; त्याच्या बुद्धीला मर्यादा नाही.
29 तो थकलेल्यांना शक्ती देतो; आणि निर्बलांस नवचैतन्य देऊन ताकद देतो.
30 तरुण लोकही थकतात आणि दमतात, आणि तरुण माणसे अडखळतात आणि पडतात.
31 पण जे कोणी परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते त्यांची नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडासारखे पंखांनी वर उडतील;
ते धावतील तरी दमणार नाहीत; ते चालतील तरी गळून जाणार नाहीत.